परकीय कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या आणि महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत एक मोठा आणि आश्चर्यकारक दावा केला आहे. २०५० पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे वक्तव्य शरीफ यांनी केले आहे. इस्लामाबाद येथे आयोजित पाकिस्तान मिनरल्स इन्व्हेस्टमेंट फोरम २०२६ ला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला. त्यांच्या या वक्तव्याची जागतिक स्तरावर जोरदार चर्चा होत आहे.
गोल्डमन सॅक्सच्या अहवालात नेमके काय
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात अमेरिकन वित्तीय संस्था गोल्डमन सॅक्सच्या डिसेंबर २०२२ मधील एका अहवालाचा दाखला दिला. द पाथ टू २०७५ नावाच्या या अहवालात असे म्हटले होते की, योग्य धोरणे राबवल्यास २०७५ पर्यंत पाकिस्तानची अर्थव्यवस्था जगात सहाव्या स्थानावर पोहोचू शकते आणि त्यावेळी पाकिस्तानचा जीडीपी सुमारे १२.७ लाख कोटी डॉलर, तर दरडोई उत्पन्न २७,१०० डॉलर इतके असू शकते.
मात्र, शरीफ यांनी या अहवालातील तारीख स्वतःच्या सोयीनुसार बदलत म्हटले की, पाकिस्तानला या टप्प्यावर पोहोचण्यासाठी २०७५ पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, तर २०५० पूर्वीच पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनेल. तज्ज्ञांच्या मते, गोल्डमन सॅक्सचा हा केवळ एक दीर्घकालीन अंदाज होता, कोणतीही ठोस भविष्यवाणी नव्हती.
पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा
शरीफ कितीही मोठे दावे करत असले तरी पाकिस्तानचे जमिनीवरील वास्तव अत्यंत बिकट आहे. सध्या पाकिस्तानवर सुमारे ८६.७२ लाख कोटी पाकिस्तानी रुपये, म्हणजेच जवळपास २९० अब्ज डॉलर इतके सार्वजनिक कर्ज आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जावर आणि अटींवर अवलंबून आहे. राजकीय अस्थिरता, दहशतवाद, कमकुवत आर्थिक पायाभूत सुविधा आणि हवामान बदलाचा फटका यांसारख्या गंभीर आव्हानांचा सामना पाकिस्तान करत आहे. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीही जगासमोर हात पसरणाऱ्या पाकिस्तानला २०५० पर्यंत जगातील सहावी अर्थव्यवस्था बनवण्याचे शरीफ यांचे वक्तव्य म्हणजे दिवास्वप्न असल्याची टीका केली जात आहे.
Leave a Reply