महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी दौऱ्यावर आलेले उत्तराखंडचे सहकारमंत्री डॉ. धनसिंह रावत यांनी नवी मुंबईतील श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटीला भेट दिली. संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली.
अभ्यास दौऱ्यासाठी निवड
महाराष्ट्रातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्थांमधून या संस्थेची अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राचे सहकारमंत्री, सहकार विभाग पुणे, सहकार आयुक्त आणि ठाणे जिल्हा उपनिबंधक यांच्या माध्यमातून ही निवड झाली. बैठकीत महाराष्ट्र आणि उत्तराखंडमधील सहकार क्षेत्राची कार्यपद्धती, सहकार कायद्यांतील तरतुदी, शेतकऱ्यांसाठीच्या योजना आणि सहकारी संस्थांसमोरील आव्हाने यांवर सविस्तर चर्चा झाली. या वेळी उपनिबंधक, सहकारी संस्था सर्जेराव कांदळकर उपस्थित होते.
दोन्ही राज्यांतील अनुभवांची देवाणघेवाण
बैठकीला संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार शरद सोनवणे, नवी मुंबई बँकेचे अध्यक्ष बी. आर. सावंत, उत्तराखंडचे उद्योजक डॉ. के. एन. पनवार, सी. ए. सुशांत आलमे, संस्थेचे सल्लागार राजन करकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत चव्हाण, महाव्यवस्थापक किशोर मोरे, उपमहाव्यवस्थापक बाळासाहेब चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण, रवींद्र ताजणे, सतीश शिंदे, सतीश सांडभोर, विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील कार्याची दखल म्हणून संस्थेची अभ्यास दौऱ्यासाठी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीमुळे दोन्ही राज्यांतील सहकारी संस्थांच्या कार्यपद्धती, कायदे आणि अनुभवांची देवाणघेवाण होऊन परस्पर सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. डॉ. रावत यांनी उत्तराखंडमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि सवलतींची माहितीही दिली.
Leave a Reply