तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होतो. यंदा देवउठणी एकादशी २० नोव्हेंबरला असून तुळशी विवाह २१ नोव्हेंबरला आहे. त्याची समाप्ती २४ नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर विवाह आणि गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यांना सुरुवात होईल. मात्र लग्नासाठी इच्छुक असलेल्या कुटुंबांना शुद्ध विवाहमुहूर्तासाठी जानेवारीअखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सिंहस्थ गुरूमुळे शुद्ध विवाहमुहूर्त २६ जानेवारी २०२७ पासून सुरू होणार आहेत. जूनअखेरपर्यंत या हंगामात एकूण ५७ शुद्ध मुहूर्त उपलब्ध असतील, अशी माहिती पंचांगतज्ज्ञ शरद आहेर यांनी दिली. नोव्हेंबर महिन्यात विवाहासाठी केवळ चार मुहूर्त असल्याने लग्नाची तयारी करणाऱ्या कुटुंबांना तारखांचे नियोजन काळजीपूर्वक करावे लागणार आहे.
महिन्यानुसार मुहूर्ताच्या तारखा
नोव्हेंबर २०२६ मध्ये २१, २४, २५ आणि २६ या तारखांना मुहूर्त आहेत. जानेवारी २०२७ मध्ये २६, २७ आणि २९, तर फेब्रुवारी २०२७ मध्ये २, ३, १०, ११, १२, १५, २१, २२, २४, २५, २७ आणि २८ या तारखांना मुहूर्त आहेत. मार्च २०२७ मध्ये १०, ११, १४, २३, २४, २५, २७, २९ आणि ३१, एप्रिल २०२७ मध्ये १, ३, १६, १८, २१, २६, २८, २९ आणि ३०, मे २०२७ मध्ये ९, १३, १४, १५, १७, १९, २०, २१, २२, २५, २६, ३० आणि ३१, तर जून २०२७ मध्ये ११, १२, १५, १७, १९, २३ आणि २४ या तारखांना मुहूर्त आहेत.
मुहूर्त ठरवताना काय पाहिले जाते
लग्नाची तारीख ठरवताना पंचांगानुसार मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अनुकूल ग्रहस्थिती आणि शुभ नक्षत्रांच्या काळात विवाह झाल्यास वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि स्थैर्य नांदते, असे मानले जाते. त्याचबरोबर वधू-वरांच्या जन्मकुंडलीचे मिलन, मंगळदोष आणि इतर ग्रहस्थितीचाही विचार केला जातो. त्यामुळे लग्नाची तारीख निश्चित करताना कुटुंबीय पंचांग आणि ज्योतिष सल्ल्याला प्राधान्य देतात, असे शरद आहेर यांनी सांगितले.
Leave a Reply