शेती करायची, नोकरीच्या मागे धावायचे की स्वतःचा व्यवसाय उभा करायचा, या प्रश्नांशी झगडणाऱ्या ग्रामीण तरुणांना रोजगाराची नवी दिशा देण्यासाठी शहापूर तालुक्यातील पिवळी येथे ६ डिसेंबरला मानसिक परिवर्तन कार्यशाळा होणार आहे. कृषी शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या ज्ञानाला प्रत्यक्ष रोजगाराची जोड देतानाच त्यांना नोकरी मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यातील कृषी पदवीधर आणि पदविकाधारक तरुणांसह दहावी व बारावी उत्तीर्ण युवकांनाही सहभागी होता येणार आहे. मात्र केवळ साठ प्रशिक्षणार्थींनाच प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
कृषी दिन आणि उपक्रमाचा उद्देश
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती २७ डिसेंबरला साजरी केली जाते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस राज्य शासनाकडून कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, वन, फलोद्यान आणि जैविक शेती अशा विविध शाखांमध्ये शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. नैसर्गिक शेती ही केवळ पिके घेण्याची पद्धत नसून त्यातून रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, हा विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्यावर कार्यशाळेत भर दिला जाणार आहे.
कमवा आणि शिका तत्त्वज्ञान
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाचा आधार घेत शहापूर तालुक्यातील पिवळी येथील माहूली गड कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या वर्षापासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक कृषी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९५० मध्ये स्थापन केलेल्या संस्थेच्या विचारधारेतून हा उपक्रम पुढे नेला जात आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ यांच्या समन्वयातून ग्रामीण युवकांना रोजगाराभिमुख करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कल्याण, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांतील इच्छुक युवकांना कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. कृषी क्षेत्रातील पदवी किंवा पदविका नसली तरी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण तरुणांसाठीही प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. या कार्यशाळेनंतर अमरावती, अकोला, नाशिक, रायगड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध भागांतही टप्प्याटप्प्याने अशा कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. इच्छुकांनी नोंदणीपूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आत्मा संस्थेची कार्यपद्धती आणि मराठीतील मार्गदर्शक सूचना समजून घ्याव्यात, असे आयोजकांनी कळविले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रा. मधुकरराव देशमुख किंवा महासंचालक डॉ. मंगेश देशमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Leave a Reply