अंदरसूल येथील सहकारमहर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे पतसंस्थेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता, आर्थिक शिस्त आणि सभासदांच्या सहकार्याच्या बळावर यशस्वी वाटचाल करणाऱ्या या पतसंस्थेच्या ठेवींनी १५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. संस्थेने नेहमीच ठेवीदार, कर्जदार आणि सभासदांचे हित जपल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
चार दशकांची वाटचाल
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय सहकारमहर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तालुक्याच्या सहकार क्षेत्राला दिशा देणारे आणि राजकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देणारे कणखर व शिस्तप्रिय नेतृत्व असलेल्या गोविंदराव सोनवणे यांनी १५ नोव्हेंबर १९८४ रोजी संस्थेचे रोपटे लावले. स्वर्गीय ॲड. सुभाषराव (आण्णा) सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून आणि संवर्धनातून या रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेने चार दशकांहून अधिक काळ सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्थापनेपासून संस्थेला सातत्याने अ वर्ग मिळत असून, सभासदांना दर वर्षी लाभांशाचे वाटप केले जाते.
संस्थेची आर्थिक स्थिती
सध्या संस्थेचे नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांत एकूण १३ शाखा कार्यरत असून, संस्थेचा स्वतःचा पेट्रोल पंपही आहे. संस्थेचे एकूण पाच हजार ४५८ सभासद असून, भागभांडवल चार कोटी २९ लाख रुपये आहे. खेळते भागभांडवल १८२ कोटी ९२ लाख रुपये इतके आहे. सभासदांना उद्योग आणि व्यवसायासाठी १०१ कोटी रुपयांचे सुरक्षित कर्जवाटप करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सभासद आणि ग्राहकांच्या सोयीसाठी संस्थेच्या सर्व शाखांमध्ये वीजबिल भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आर्थिक व्यवहारांसोबतच ग्राहकाभिमुख सेवांनाही संस्थेने प्राधान्य दिले आहे.
वर्धापन दिन कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पुंड, संचालक अमोल सोनवणे, मकरंद सोनवणे, मयूर सोनवणे, जनार्दन जानराव, राघूमामा जाधव, केशव सोनवणे, प्रकाश सोनवणे, रामनाथ एंडाईत, कचरू गवळी, अशोक एंडाईत, द्वारकानाथ सोनवणे, दत्ता थोरात, व्यवस्थापक चिंतामणी भालेराव आणि सुनील पुंड उपस्थित होते. मुख्य व्यवस्थापक साहेबराव आहेर यांनी सूत्रसंचालन केले, तर मकरंद सोनवणे यांनी आभार मानले.
Leave a Reply