रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

महिला सवलत : स्मार्ट कार्डची सक्ती ३० नोव्हेंबरपर्यंत शिथिल

एसटीने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्त शिथिल केली असून ३० नोव्हेंबरपर्यंत कार्ड नसतानाही एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे.

महिला सवलत : स्मार्ट कार्डची सक्ती ३० नोव्हेंबरपर्यंत शिथिल

डिजिटल प्रक्रियेतील अडचणी आणि एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीबाबत ग्रामीण भागातील महिलांमधील अनभिज्ञता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती तूर्त शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता ३० नोव्हेंबरपर्यंत महिलांना स्मार्ट कार्ड नसतानाही एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले होते. एक ऑक्टोबरपासून कार्डाशिवाय सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांना स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया माहीत नसल्याने आणि कार्ड मिळवताना तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणी आणि कार्डवाटपाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढला नव्हता. त्यामुळे अनेक महिलांना सवलतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने सात ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्मार्ट कार्डची सक्ती शिथिल केली आहे. या मुदतीत महिलांना पूर्वीप्रमाणेच ५० टक्के सवलतीत प्रवास करता येणार आहे.

मुदत संपल्यानंतर कार्ड अनिवार्य

मुदत संपल्यानंतर सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य राहणार असल्याने पात्र प्रवाशांनी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे. दरम्यान, कार्ड नोंदणी प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांचे बायोमॅट्रिक जुळत नसणे, बोटांचे ठसे न उमटणे आणि कार्ड सक्रिय होण्यास विलंब अशा अडचणी येत होत्या. आता आधारशी संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातूनही नोंदणी करता येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

परभणी विभागातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील सातही आगारांतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. उर्वरित पात्र महिलांनी मुदतीपूर्वी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance