हिंगोली जिल्ह्यात सकाळी आणि रात्री जाणवणारा गारवा, तर दुपारी उन्हाचा वाढणारा कडाका अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे शासकीय आणि खासगी रुग्णालयांच्या ओपीडीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात सध्या कमाल ३१ तर किमान १६ अंश तापमान नोंदविले जात आहे. सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवत असून, दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढत आहे. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने तापमानात बदल होत आहेत. या वातावरणामुळे घशात खवखवणे, गिळताना त्रास होणे, नाक वाहणे, वारंवार शिंका येणे, कोरडा खोकला आणि ताप अशा तक्रारी घेऊन नागरिक डॉक्टरांकडे जात आहेत. काही रुग्णांमध्ये खोकला कमी होण्यासाठी अधिक कालावधी लागत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
रुग्णालयांची ओपीडी वाढली
हवामानातील बदलामुळे सध्या नागरिकांमध्ये श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील संसर्ग, तसेच फुप्फुसे आणि श्वसननलिकेतील संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. यामध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांचाही समावेश आहे. ताप, अंगदुखी, उलटी आणि मळमळ ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत. हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची दररोजची ओपीडी सरासरी सातशे असते. परंतु, वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्या वाढून ओपीडी आठशे ते साडेआठशेवर पोहोचली आहे. म्हणजेच जिल्हा रुग्णालयात जवळपास शंभर ते दीडशे रुग्णांची भर पडली आहे. खासगी रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. दम्याच्या रुग्णांना या वातावरणात अधिक त्रास जाणवत असून रुग्णांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा अधिक समावेश आहे.
आरोग्याची काळजी अशी घ्या
बदलत्या वातावरणात थंड पदार्थ खाणे टाळावे आणि शक्यतो कोमट किंवा गरम पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. घशात खवखव किंवा दुखत असल्यास कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. धूळ आणि धुरापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा आणि आवश्यकतेनुसार वाफ घ्यावी. वैयक्तिक स्वच्छता राखावी आणि आजारी असल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी. ताप किंवा खोकला दीर्घकाळ कायम राहिल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक त्रास दम्याचे रुग्ण, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होत असल्याचे छाती, हृदयरोग व ॲलर्जीतज्ज्ञ डॉ. पवनकुमार गिरी यांनी सांगितले. तर सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे जनरल सर्जन डॉ. संदीप शिंदे यांनी म्हटले आहे.
Leave a Reply