पुण्यातील एफसी रोडवरील वैशाली आणि रुपाली या दोन प्रसिद्ध हॉटेलांवर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आणि आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
तपासणीत काय आढळले
स्वयंपाकघरातील अस्वच्छता, उघड्यावर अन्नपदार्थांची साठवणूक आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. तपासणीत वैशाली हॉटेलला ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाले. यापूर्वी नोटीस देऊनही त्रुटी कायम राहिल्याने वैशाली हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
रुपाली रेस्टॉरंटमध्येही अस्वच्छता, अयोग्य अन्नसाठवणूक आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळला. दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
विक्री आणि होम डिलिव्हरीवर बंदी
परवाने पूर्ववत होईपर्यंत या दोन्ही हॉटेलांमधील विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटविरोधात सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. याआधी डॉमिनोज पिझ्झा असो किंवा केएफसी, कोणत्याही नामांकित आऊटलेटवर कारवाई करताना मागेपुढे पाहिले गेलेले नाही.
Leave a Reply