वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात यंदा पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतातील पिके पाण्याअभावी सुकू लागली असून, हळद, तूर आणि फळबागा वाचवणे हे शेतकऱ्यांसमोरचे सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे पैनगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
देशमुख यांनी ९ तारखेला मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात रिसोड तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. पावसाचा खंड दीर्घकाळ राहिल्याने शेतातील उभी पिके सुकत आहेत. विशेषतः हळद आणि तूर या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. वेळेत पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे, अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
पेनटाकळी प्रकल्पाचे पाणी रिसोडपर्यंत पोहोचवण्याची मागणी
बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातून पाणी जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सोडण्यात आले आहे. रिसोड तालुका बुलडाणा जिल्ह्याला लागून असल्याने हे पाणी पैनगंगा नदीच्या पात्रातून पुढे सोडल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळू शकतो. पिके वाचवण्यासह संभाव्य आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल, असे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.
पुराचा धोकाही लक्षात घेण्याची सूचना
मात्र पाणी सोडताना नदीकाठच्या गावांमधील पूरपरिस्थितीचाही विचार करणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी नमूद केले आहे. पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर पावसाचे प्रमाण अचानक वाढले तर रिसोड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसू शकतो. अतिवृष्टीच्या काळात या भागातील शेतकऱ्यांचे यापूर्वीही मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह अन्य आवश्यक वापरासाठी आरक्षित असलेला साठा अबाधित ठेवून त्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी योग्य नियोजन करून पैनगंगा नदीच्या पात्रात सोडावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. हे पाणी रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने निर्देश द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. आता या मागणीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply