धुळे शहरात येत्या शनिवारपासून योगप्रेमींचा मोठा मेळावा भरत आहे. राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलनाच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन देवपूर परिसरातील श्री स्वामिनारायण मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात राज्यभरातील योगाचार्य, शिक्षक, साधक आणि योगप्रेमी एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
योग फाउंडेशनच्या महाराष्ट्र योगशिक्षक संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. योगाचा प्रसार करणे आणि योगशास्त्रातील नव्या प्रयोगांबाबत मार्गदर्शन मिळवणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. या निमित्ताने धुळेनगरीत योगजगताचा एक आगळावेगळा संगम अनुभवायला मिळणार आहे.
दोन दिवसांचा कार्यक्रम कसा असेल?
शनिवारी सकाळी योगसत्र, सूर्यनमस्कार, ध्यान आणि ध्वजारोहणाने सोहळ्याला सुरुवात होईल. सकाळी दहा वाजता उद्घाटन समारंभ होईल. दुपारच्या सत्रात डॉ. विजयश्रीनाथ कंची, डॉ. रजनी प्रधान, डॉ. राजेश जैन, कृष्णकुमार शिंदे, सीताराम सोलटकर आणि प्रा. गोविंद फुक्के हे मार्गदर्शन करतील. सायंकाळी संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून शंखनाद, ध्यान, प्राणायाम आणि वॉटर योगचे सत्र होईल. यामध्ये डॉ. श्रीकांत वाडिले, डॉ. सुशील महाजन आणि डॉ. जितेंद्र भामरे हे मानसोपचार, मणक्याचे विकार आणि आरोग्यावर योगशास्त्राचा आधार या विषयांवर मार्गदर्शन करतील. दुपारी राज्य योगसन क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण होईल आणि दुपारी साडेतीन वाजता सोहळ्याचा समारोप होईल.
मान्यवरांची उपस्थिती
पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महापौर मायादेवी परदेशी, आमदार अमरिशभाई पटेल, खासदार डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, बीपीएस स्वामिनारायण मंदिराचे संत आनंदजीवन स्वामी आणि आमदार राम भदाणे हेही उपस्थित राहणार आहेत.
परजिल्ह्यातून येणाऱ्या योगसाधकांसाठी धुळे रेल्वेस्थानक आणि मध्यवर्ती बस स्थानकापासून स्वामिनारायण मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. योगप्रेमींनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन योग फाउंडेशन आणि जिल्हा स्वागतोत्सुक समितीने केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply