दिवाळीच्या सणात नाशिककरांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मनमुराद खरेदी केली आहे. या निमित्ताने मोबाईल खरेदीला सर्वाधिक पसंती मिळाली असून, फ्रीज, टीव्ही आणि एसीच्या खरेदीकडेही ग्राहकांचा कल दिसून आला. एकूणच, दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात साधारण ७० ते ७५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
यंदा सलग सुट्या लागून आल्याने नागरिकांनी सहकुटुंब दिवाळी सणाचा आनंद लुटला. त्याचबरोबर पगार आणि दिवाळीचा बोनस हाती मिळाल्याने शहरवासीयांनी खरेदीलाही प्राधान्य दिले. बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या मोबाईल खरेदीला सर्वाधिक पसंती मिळाली. सुमारे १० हजार रुपयांपासून ते दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंतच्या मोबाईल्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या क्षेत्रात ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
घरगुती उपकरणांनाही मागणी
शहरवासीयांनी दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक्स घरगुती उपकरणे घरी नेली. विशेषतः ३२ इंचांपासून पुढील अँड्रॉइड टीव्हीला सर्वाधिक मागणी होती. त्याखालोखाल वॉशिंग मशीन्स, एसी आणि कूलरच्या खरेदीकडेही ग्राहकांचा कल दिसला. दरम्यान, यावेळी बहुतांश कंपन्यांनी इलेक्ट्रिक कॅटल, एअर फ्रायर यांसारख्या निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेट स्वरूपात कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यामुळे एकूणच या क्षेत्रात साधारण ४० कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाल्याचे समजते आहे.
दिवाळीमुळे क्षेत्राला बूस्ट
जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकडे किती प्रमाणात वळतील, अशी शंका बाजारपेठेत होती. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध शोरूम्सकडून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीवर ऑफर आणि भेटवस्तू ठेवल्या होत्या. पण, ग्राहकांनी दिलेला प्रतिसाद पाहता या क्षेत्रातील मरगळ दूर होत खऱ्या अर्थाने क्षेत्राला बूस्ट मिळाला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply