धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील नरेंद्र नेरकर यांच्यावर मोफत खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या वैद्यकीय कक्षाच्या पाठपुराव्यामुळे ही शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत झाली. खासगी रुग्णालयात या उपचारांसाठी पाच ते सात लाख रुपये खर्च अपेक्षित होता; मात्र सरकारी योजनेचा लाभ मिळवून दिल्याने नेरकर कुटुंबावरील मोठा आर्थिक भार हलका झाला आहे.
नेरकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची गरज होती. या उपचारांचा खर्च मोठा असल्याने नेरकर कुटुंब चिंतेत होते. हे राजशिष्टाचार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रावल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय कक्षाला आवश्यक ती सर्व मदत करण्याची सूचना दिली. मंत्री रावल यांच्या वैद्यकीय कक्षाने ठाणे येथील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाशी संपर्क साधून योग्य समन्वय साधला. शासकीय आरोग्य योजनेंतर्गत कागदपत्रांची पूर्तता व पाठपुरावा केल्याने नेरकर यांच्या एका खुब्याची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.
दुसऱ्या खुब्याची शस्त्रक्रियाही मोफत होणार
प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर लवकरच त्यांच्या दुसऱ्या खुब्याचीही शस्त्रक्रिया याच योजनेंतर्गत मोफत केली जाणार आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणताही गरजू रुग्ण महागड्या आणि वेळेवर मिळणाऱ्या आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, हा मंत्री रावल यांच्या वैद्यकीय कक्षाचा मुख्य उद्देश आहे. या संवेदनशील पुढाकारामुळे नेरकर कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply