सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातील एकूण ६५ आरोग्य उपकेंद्रांना राज्यस्तरीय मानांकन मिळाले आहे. त्यात दिंडोरी तालुक्याचा वाटा सर्वाधिक असून तालुक्यातील ४८ पैकी ४० उपकेंद्रांनी हे मानांकन पटकावले आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा दर्जा सातत्याने उंचावण्याच्या प्रयत्नांना या यशामुळे नवी गती मिळाली आहे.
यंदा ३१ उपकेंद्रांना मानांकन
यंदा मानांकन मिळालेल्या ३१ उपकेंद्रांमध्ये दहिवी, देवसाने, फोफळवाडे, हस्तेदुमाला, जालखेड, जांबुटके, निळवंडी, वलखेड, जानोरी १, जानोरी २, जोपुळ, करंजवण, खडकसुकेणे, कोकणगाव, कोशिंबे, लखमापूर, मडकिजांब, म्हाजे, मातेरवाडी, मावडी, नाळेगाव, पालखेड, पिंपळणारे, पिंप्रीअंचला, राजापूर, रासेगाव, रवळगाव, ठेपणपाडा, तिसगाव, टिटवे आणि पळसविहीर यांचा समावेश आहे. याआधी नवेदेगाव, कोऱ्हाटे, चौसाळे, आंबेवणी, आंबेगण, अहिवंतवाडी, अंबानेर, चिंचखेड आणि आंबेदिंडोरी या नऊ उपकेंद्रांना मानांकन मिळाले होते. त्यामुळे तालुक्यातील मानांकित उपकेंद्रांची एकूण संख्या ४० वर पोहोचली आहे.
ग्रामीण आरोग्यसेवेला बळ
ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि तत्पर आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. उर्वरित उपकेंद्रांनाही मानांकन मिळवून देण्यासह सेवेचा दर्जा आणखी उंचावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे व डॉ. हर्षल नेहते, गटविकास अधिकारी सुनील पाटील आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. नीलिमा बच्छाव आणि आरोग्यसेवक परमेश्वर म्हस्के यांनी या उपक्रमाच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे यांनी हे यश एका व्यक्तीचे नसून सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका आणि आशा स्वयंसेवकांच्या सांघिक मेहनतीचे फलित असल्याचे सांगितले. दिंडोरी तालुक्यातील आरोग्य विभागाचे हे यश ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी मानले जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply