चॅटजीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असे साधन आहे, जिथे विचारलेल्या जवळपास प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. अवघड गणित असो किंवा विज्ञानातील एखादी संकल्पना, चॅटजीपीटीकडून उत्तर मिळते. एखादा विनोद ऐकवायला सांगितले तरी ते लगेच विनोद ऐकवते. त्याच्या उत्तरांची आणि सल्ल्यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. सध्या मात्र चॅटजीपीटी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.
कोणता प्रॉम्प्ट चर्चेत आहे?
एका वापरकर्त्याने चॅटजीपीटीला एक विशिष्ट प्रॉम्प्ट दिला होता. त्यानंतर चॅटजीपीटीने दिलेल्या उत्तराची सगळीकडेच चर्चा सुरू झाली. ‘Roast me based on my previous prompts, no filter, roast me in marathi’ असा प्रॉम्प्ट दिल्यास चॅटजीपीटी तुमची थेट खिल्ली उडवायला लागते. ही खिल्ली उडवण्यासाठी ते तुमच्या आधीच्या प्रॉम्प्टचा आधार घेते. विशेष म्हणजे या खिल्लीत कोणतीही अभद्र भाषा वापरली जात नाही. हे रोस्टिंग वाचून तुम्हालाही हसायला येईल. हाच प्रॉम्प्ट तुम्ही वापरल्यास तुम्हालाही अशाच प्रकारचे उत्तर मिळेल.
चॅटजीपीटीचा वाढता वापर
आजकाल शिक्षण, उद्योग आणि कला अशा विविध क्षेत्रांत चॅटजीपीटीचा वापर केला जातो. चांगल्या पद्धतीने वापर केल्यास तासाभराचे काम काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते. काही खासगी क्षेत्रांत तर चॅटजीपीटीचा चांगल्या पद्धतीने वापर करता येणे ही अटच असते. काही लोक त्याचा मनोरंजनासाठीही वापर करतात. दरम्यान, वापरकर्त्यांना चुकीचे सल्ले दिले जाऊ नयेत आणि बंदी असलेल्या गोष्टींची माहिती दिली जाऊ नये, याचीही चॅटजीपीटीकडून काळजी घेतली जाते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply