काळाच्या ओघात पृथ्वीच्या पोटात लुप्त झालेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी जगभरातील ऐतिहासिक ठिकाणी सतत उत्खनन सुरू असते. असेच उत्खनन कजाकिस्तानमधील अल्माटी शहरातील एका कब्रस्तानात सुरू होते. या उत्खननादरम्यान संशोधकांना एक मोठी गोष्ट हाती लागली आहे.
छोट्याशा वस्तूमुळे मोठा शोध
उत्खनन सुरू असताना या क्षेत्रातील तज्ज्ञांची नजर एका छोट्याशा वस्तूवर पडली. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आणखी खोदकाम करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे खोदकाम पूर्ण झाले, तेव्हा त्यांना तिथे संपूर्ण सोन्याच्या धातूचे एक अस्वल आढळून आले. समोर आलेल्या माहितीनुसार हे सोन्याचे अस्वल तब्बल २२०० वर्षे जुने आहे.
प्राचीन काळात काही लुटारूंच्या टोळ्यांनी या ठिकाणी असलेल्या एका मकबऱ्याची तोडफोड केली होती. हा मकबरा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला होता. याच ठिकाणी संशोधन सुरू असताना हा खजाना संशोधकांच्या हाती लागला आहे.
सोन्याचे अस्वल नेमके कसे आहे?
हे सोन्याचे अस्वल आपल्या मागच्या दोन पायांवर उभे आहे. त्याचे पुढचे दोन पाय हवेत आहेत. या अस्वलाच्या हातात एक भांडे आहे, तेही संपूर्णपणे सोन्याचेच आहे. या अस्वलाबद्दल सांगताना संशोधकांनी सांगितले की, जेव्हा राजा आपल्यासाठी पोशाख शिवायचा, तेव्हा त्या पोशाखामध्ये या प्रकारच्या अस्वलाच्या मूर्ती लावल्या जायच्या. त्यातीलच हे एक अस्वल असावे.
दरम्यान, या अस्वलामुळे आता संशोधकांना दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास समजून घेण्यास मदत होणार आहे. याबाबत बोलताना येथील सरकारी अधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हे सोन्याचे अस्वल अंदाजे २२०० वर्षे जुने असावे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पूर्वीचे राजे आपला पोशाख शिवताना डोक्यावर जी टोपी घालत, त्यामध्ये अशा प्रकारच्या कलाकृतीही लावत होते, त्यातीलच ही एक कलाकृती असावी, असे सरकारने म्हटले आहे. या कब्रस्तानामध्ये माणसांची हाडेही मोठ्या संख्येने आढळून आली आहेत, जे पाहून संशोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply