शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुळ्यात दीपावली पहाट संगीत मैफलीत मदतीचा हात

धुळ्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि वंचित कुटुंबांना फराळ वाटप या सामाजिक उपक्रमांची सांगड घालत ‘दीपावली पहाट’ संगीत मैफल मोठ्या उत्साहात पार पडली.

धुळ्यात दीपावली पहाट संगीत मैफलीत मदतीचा हात

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, जनावरांच्या चारा-पाणी टंचाईवर उपाययोजना आणि दीपावलीच्या आनंदापासून वंचित गरीब कुटुंबांना फराळ वाटप यांसारख्या सामाजिक उपक्रमांची सांगड घालत धुळ्यात ‘दीपावली पहाट’ संगीत मैफल उत्साहात पार पडली. कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था आणि कापडणे (ता. धुळे) येथील जोगाईमाता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

लक्ष्मीपूजनाच्या पर्वानिमित्त राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कल्याण भवन येथे झालेल्या या मैफलीचे उद्घाटन पुणे येथील प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग येथील मुख्य अभियंता अनिल पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन जोगाईमाता संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी केले.

भावगीते, अभंग आणि देशभक्तीपर गीते

या मैफलीत संस्थेचे सभासद अविनाश मोरे, डी. डी. सोनार, राजेंद्र महाले, ॲड. धनराज भामरे, राजेश सोनार, अशोक खैरनार, गिरीधर खेडवनकर व अरुण विसपुते यांनी भावगीते, अभंग व देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच अभियंता वासुदेव पवार यांच्या संगीत समा ऑर्केस्ट्राच्या आसावरी गुरव, गायक पारिजात चव्हाण, ऋषिकेश चव्हाण व सुरेश चत्रे यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांची माहिती देणे व गरजूंना फराळ वितरणाचे कार्य कार्यकर्त्यांमार्फत सुरू असल्याचे योगेश पाटील यांनी सांगितले. दुष्काळग्रस्तांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि वंचितांची दिवाळी गोड करणे, हे कृतिशीलचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अनिल पवार यांनी केले.

कृतिशीलचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी निवृत्तांनी आपला अनुभव समाजहितासाठी वापरावा व छंद जोपासत संस्थेशी जोडून घ्यावे, असे आवाहन केले. निवृत्त शिक्षणाधिकारी जयप्रकाश पाटील यांनी काव्यवाचन व गीतगायनातून मार्गदर्शन केले. या वेळी राजेंद्र माळी, मेहेरगावचे उपसरपंच दिनेश पाटील, आशा पाटील, हर्षदा पाटील, सुनंदा निकम, मिलिंद मिस्त्री, देविदास शिरुडे, हरिश्चंद्र रेंडे, बी. एन. बिरारी, कैलास चौधरी, अंबादास खैरनार, प्रदीप जगताप, प्रा. ए. डी. पाटील आदी उपस्थित होते. महेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance