दिवाळीच्या सलग पाच दिवसांच्या सुट्या संपल्यानंतर गुरुवारी शासकीय कार्यालये पुन्हा उघडली. मात्र कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य राहिली. सर्वसामान्य नागरिकांनीही कार्यालयांकडे पाठ फिरवली. त्यामुळे दिवाळीनंतरच्या पहिल्याच कामाच्या दिवशी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
यंदा वीकेंड आणि दिवाळीच्या सलग सुट्या एकत्र आल्यामुळे गुरुवारी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची प्रवेशद्वारे उघडली, तरी जवळपास सर्वच कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती बोटावर मोजण्याइतकीच होती. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही वेगळे चित्र नव्हते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद त्यांच्या दालनात उपस्थित होते, मात्र बहुतांश विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी रजेवर होते.
ग्रामीण भागातील नागरिकांनीही टाळली गर्दी
ग्रामीण भागातून कामे घेऊन येणाऱ्या जनतेने दिवाळीचा फिव्हर लक्षात घेऊन मुख्यालयी येणे टाळले. त्यामुळे एरवी गजबजणाऱ्या कार्यालयात शुकशुकाट नजरेस पडला. नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास आयुक्तालय आणि भूमी अभिलेख कार्यालयांसह नागरिकांचा कायम संपर्क येणाऱ्या विविध कार्यालयांमध्येही अपेक्षेप्रमाणे गर्दी दिसली नाही.
फाईलींचा प्रवास रखडला
जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागांमध्ये अधिकाऱ्यांसमोर फाईली पडून होत्या. मात्र बहुतांश फाईलींबाबत माहिती देण्यासाठी कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दुपारपर्यंत हातातील कामे पूर्ण करून सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास घराकडची वाट धरली.
शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये शुक्रवारी कामकाज सुरू राहणार आहे. मात्र त्यानंतर लगेचच पुढील दोन दिवस वीकेंडच्या सुट्या आहेत. त्यामुळे बहुतांश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रजा काढली आहे. परिणामी सोमवारपासूनच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचे कामकाज पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply