भारतीय रंगभूमीवरील भाषा, लोकपरंपरा आणि सादरीकरणाच्या वेगवेगळ्या शैलींमधून नाटकांचे अनेक प्रयोग होत असतात. ही प्रादेशिक आणि कलात्मक विविधता मुंबईकरांसमोर आणण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) आणि टीमवर्क आर्टस् यांनी एकत्र येऊन चार दिवसांचा नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे. १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान एनसीपीएच्या प्रायोगिक रंगमंचावर हा महोत्सव होणार असून, त्यात मल्याळम, बंगाली, बुंदेली आणि हिंदी या चार भाषांतील नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे.
चार दिवस, चार नाटके
महोत्सवाची सुरुवात गुरुवारी, १२ नोव्हेंबर रोजी ‘द ओल्ड मॅन अँड द सी – कथकली ऑफ द मॉरो’ या मल्याळम नाटकाने झाली. शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी सुमन साहा दिग्दर्शित ‘निःसंगो ईश्वर’ हे बंगाली नाटक सादर होणार आहे. १४ नोव्हेंबरला ‘द डिपार्टेड डॉन’ हा संवादाविना सादर होणारा ६० मिनिटांचा प्रयोग पाहायला मिळेल. महोत्सवाची सांगता १५ नोव्हेंबरला ‘स्वांग : जस की तस’ या नाटकाने होणार आहे.
पुरस्कार सोहळ्यातील सादरीकरणांमधून निवड
या महोत्सवातील नाटकांची निवड ‘महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्डस्’ (मेटा) या नाट्य पुरस्कार सोहळ्याच्या २०२३, २०२५ आणि २०२६ या वर्षांतील सादरीकरणांमधून करण्यात आली आहे. पारंपरिक कथकलीपासून लोकनाट्य, पौराणिक आशय आणि संवादाविना कथन करणाऱ्या प्रयोगापर्यंत विविध प्रकार या महोत्सवात पाहायला मिळतील. टीमवर्क आर्टस् प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय के. रॉय यांनी भारतीय रंगभूमीतील भाषा, संहिता आणि नाट्यपरंपरांच्या वैविध्याचा उल्लेख केला. एनसीपीएच्या नाट्य आणि चित्रपट विभागाचे प्रमुख ब्रूस गुथ्री यांनी २०२६ मधील महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर आर्टस्चे एनसीपीए मध्ये स्वागत करताना आनंद व्यक्त केला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply