मालेगाव शहरात गेल्या काही दिवसांत अपघात, चोरी आणि आकस्मिक मृत्यूच्या पाच घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकरणांत पोलिस ठाण्यांत नोंदी करण्यात आल्या असून काही प्रकरणांचा तपास सुरू आहे.
वीज आणि प्रसूतीदरम्यान मृत्यू
रजियाबाद भागातील मोहम्मद अश्पाक मोहम्मद रियाज (वय २७) यांना राहत्या घरी वीजेचा धक्का लागल्याने ते घरावरून खाली पडले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचे मामा मोहम्मद हुसेन अब्दुल खालीद यांनी त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. १० नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. द्याने रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दुसऱ्या घटनेत शाहीना बानो मेहबूब आलम (वय ३६) यांची २४ ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास इन्सिया हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली. प्रकृती खराब झाल्याने त्यांच्या पतीने त्यांना रात्री सव्वानऊला सहारा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रकृती अधिक खराब झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने २५ ऑक्टोबरला रात्री दहाला त्यांना धुळे येथील हिरे कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. २९ ऑक्टोबरला सकाळी साडेआठला उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आझादनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
चोरी आणि रस्ता अपघात
धुळे येथील खय्याम शफिक अन्सारी (वय ६१) यांचा २८ हजार रुपयांचा मोबाईल दरेगाव बारी येथे तिघा भामट्यांनी युनिकॉर्न दुचाकीवरून येऊन बळजबरीने हिसकावून नेला. ९ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. पवारवाडी पोलिस ठाण्यात तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दसाणे शिवारात दसाणे फाटा ते दसाणे रस्त्यावरील हड्डी कारखान्यासमोर निता चंद्रकांत पाटील (वय ३२) यांची १ लाख २० हजार रुपयांची सोन्याची पोत विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी भामट्यांनी हिसकावून नेली. बुधवारी (ता. ११) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई-आग्रा रस्त्यावरील सवंदगाव फाट्याजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार शेख शब्बीर शेख मुनाफ (वय ३९) ठार झाले, तर पाठीमागे बसलेले मुनव्वर खान मनसूर खान गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकहून धुळ्याकडे जाणाऱ्या मारुती सुझुकी वॅगनर कारने पुढे चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ९ नोव्हेंबरला सकाळी पाऊणेनऊच्या सुमारास अपघात झाला. पवारवाडी पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply