दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि नातेवाइकांच्या भेटीगाठींचा काळ. मात्र, याच सणाच्या निमित्ताने सासुरवाडीला आलेल्या शिक्षक जावयाच्या अचानक बेपत्ता होण्याची घटना बागलाण तालुक्यातील बोढरी येथे घडली आहे. सुनील रामराव पिंपळे (वय ४०, रा. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे बेपत्ता झालेल्या जावयाचे नाव आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या करंजी येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत सुनील पिंपळे गुरुवारी सासुरवाडीत आल्यानंतर सायंकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला जात असल्याचे सासरे संतोष सोनवणे यांना सांगितले. नेहमीप्रमाणे वेळेत परत येतील, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने पत्नीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी पाच मिनिटांत येतो असे सांगितले. त्यानंतरही अर्धा तास उलटून गेला; परंतु पिंपळे घरी पोहोचले नाहीत. पत्नीने पुन्हा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल स्विच ऑफ असल्याचे आढळून आले.
रात्रभर शोधाशोध
जावई रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाइकांनी रात्रभर शोधाशोध केली. बोढरी गावालगत मोठ्या प्रमाणात जंगल परिसर आहे. रात्रीच्या वेळी नातेवाइकांनी जंगल परिसर पिंजून काढला. मात्र, सर्व प्रयत्न करूनही सुनील पिंपळे यांचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर जायखेडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
माहिती देण्याचे आवाहन
बेपत्ता सुनील पिंपळे यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास अथवा ते कुठे आढळून आल्यास त्वरित जायखेडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply