नंदगवळी राजा यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला ‘सगर पूजन’ उत्सव नंदुरबारात जल्लोषात साजरा करण्यात आला. वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे आयोजित या उत्सवाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाडव्यानिमित्त आयोजित या उत्सवात नंदुरबार शहरात रेड्यांच्या झुंजी झाल्या नाहीत; मात्र तालुक्यातील वावद येथे रेड्यांची टक्कर आणि कुस्त्या भरविण्यात आल्या.
वावद येथे रेड्यांची झुंज, कुस्त्या
नंदुरबार येथील यादबोले परिवारातील ‘बादल’ रेडा या उत्सवात आकर्षण ठरला. देवर्षी, घुगरे, नागापुरे आणि हुच्चे परिवार रेडे मिरवणुकीत सहभागी झाले होते. गवळीवाडा, सिदाजी आप्पा देवर्षी नगर, बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर, शिवाजी रोड, सुभाष चौक आणि नाट्यमंदिर परिसरातून रेड्यांची ढोल-ताशे, संबळ आणि डीजेच्या तालावर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. समाजातील इतर पशुमालकांनी देखील आपले रेडे सजवून मिरवणुकीद्वारे सोनी विहीर येथे पूजनासाठी आणले होते. या प्रसंगी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी आणि नगरसेवक गौरव चौधरी, दीपक दिघे यांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. पारंपरिक वाद्य आणि डीजेच्या तालावर फटाक्यांची आतषबाजी करीत सगर उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
शेकडो वर्षांची परंपरा
नंदुरबार तालुक्यातील वावद येथे रेड्यांची झुंज झाली. विजय लक्ष्मण गवळी यांच्या रेड्याला विजयी ठरवून आयोजन समितीतर्फे चांदीची ढाल बक्षीस देण्यात आली. तसेच याठिकाणी कुस्त्यादेखील लक्षवेधी ठरल्या. विशाल लगडे यांनी कुस्त्यांमध्ये चमकदार कामगिरी दाखविली. वावदसह पंचक्रोशीतील विविध ठिकाणच्या मल्लांनी सहभाग नोंदवून रोख बक्षिसे जिंकली. महाभारत काळात श्रीकृष्ण भगवान यांनी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजबांधवांच्या पशुधनाचे रक्षण केले, तेव्हापासून ही प्रथा सुरू असल्याचे सांगितले जाते. शेकडो वर्षांपासून नंदुरबार शहरात वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे सगर उत्सवाची परंपरा टिकून आहे, असे महादू हिरणवाळे यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply