पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर झालेल्या भीषण हल्ल्यात ११ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात १२ पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात घडली. हल्ल्याची ही बातमी समोर येताच संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे.
हल्ला नेमका कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध पद्धतीने सोन्याचे उत्खनन होत असताना त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे एक पथक मोहिमेवर निघाले होते. याच दरम्यान रात्रीच्या वेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी पोलिसांच्या पथकावर अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात ११ पोलिसांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ पोलीस जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा हल्ला कोहाट आणि करक जिल्ह्यांच्या मधोमध असलेल्या जलंधर बांदा या भागात झाला. हल्लेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर त्यांच्या पाच वाहनांना आग लावली. हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू आहे.
पाकिस्तानसमोर मोठे आव्हान
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानात पोलिसांवर आणि लष्करावर हल्ले होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. देशांतर्गतच होत असलेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. असे हल्ले होऊ नयेत यासाठी वेळोवेळी रणनीती आखली गेली, मात्र त्या रणनीतीचा फायदा झालेला दिसत नाही.
या ताज्या घटनेनंतर खैबर पख्तुनख्वा भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असून जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply