ऐन दिवाळीत ठाणे शहर आणि परिसरातील आगींचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या २४ तासांत ठाणे, कळवा, दिवा, वागळे इस्टेट आणि मुंब्रा परिसरासह विविध भागांत आगीच्या १३ घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी कचरा, झाडे, गवत आणि प्लॅस्टिक ताडपत्रीने पेट घेतला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या तत्परतेमुळे आगींवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
सोमवारपासून मंगळवारपर्यंत आगीची मालिका
वागळे इस्टेटमधील बंजारा वस्ती, मेंटल हॉस्पिटलजवळ सोमवारी रात्री कचऱ्याला आणि ताडाच्या झाडांना आग लागली. त्याच परिसरातील शांतीनगर येथे दुकानाच्या छतावरील प्लॅस्टिक ताडपत्रीला आग लागली, तर खार्टन रोडवरील गुजराती चाळीच्या छतावरील ताडपत्रीनेही पेट घेतला. पाचपाखाडीतील धर्मवीरनगर येथेही मध्यरात्री कचऱ्याला आग लागली.
नवी मुंबईतील दहिसर गाव परिसरातील ठाकूरपाडा येथील नैनी इंटरप्राईजेस या कंपनीच्या दोन प्लॅस्टिक गोदामांना रात्री आग लागली. आगीची व्याप्ती लक्षात घेऊन नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल पालिकेच्या अग्निशमन दलाची एकूण सहा वाहने घटनास्थळी दाखल झाली. पहाटे आग पूर्णपणे विझवण्यात आली. मंगळवारी दिवसभरातही आगीच्या घटनांची मालिका सुरूच राहिली. दिव्यातील चुहा ब्रिजजवळ, रुणवालनगर, वर्तकनगरमधील शास्त्रीनगर नाका येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात आणि कळव्यातील पारसिकनगर येथे गटारातील कचऱ्याला आग लागली. हिरानंदानी इस्टेटमधील डोंगरीपाडा येथे झाडाला, तर शीळ येथील कल्याण फाटा परिसरात गवताला आग लागली.
मंडप गोदाम आणि हातगाड्या जळाल्या
बुधवारी पहाटे खारेगाव येथील ६० फूट रस्त्यावरील पंचरत्न द्वाराजवळ रोशन मंडप डेकोरेटर्सच्या गोदाम शेडला आग लागली. या आगीत मंडप सजावटीसाठी वापरण्यात येणारे लाकडी साहित्य, कार्पेट आणि गोदामाचे शेड जळून नुकसान झाले. त्याच पहाटे वागळे इस्टेटमधील किसननगर क्रमांक एक येथील महाराष्ट्रनगर भाजी मार्केटमध्ये तीन हातगाड्यांना आग लागली. त्यानंतर पाचपाखाडी येथील प्रशांत कॉर्नरसमोर प्रदीप स्क्वेअर इमारतीच्या आवारातील कचऱ्याला आणि दोन झाडांना आग लागली.
उल्हासनगरात दिवाळीच्या अवघ्या चार ते पाच दिवसांत ५० हून अधिक आगीच्या घटनांनी अग्निशमन दलाची दमछाक केली. या आगी विझवण्यासाठी १५ ते २० टँकर पाण्याचा वापर करावा लागला. शहरातील विविध भागांत लागलेल्या लहान-मोठ्या आगींमध्ये उघड्यावर साचलेल्या कचऱ्याला लागलेल्या आगींचाही समावेश असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे यांनी दिली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply