दिवाळी म्हणजे खरेदीचा उत्सव आणि नवीन वाहन घरी आणण्यासाठी हक्काचा मुहूर्त, मात्र यंदा या उत्साहाला महागाईचे ग्रहण लागल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले आहे. दिवाळीच्या १० दिवसांत वाहनखरेदीचा अपेक्षित धडाका दिसण्याऐवजी वाहन नोंदणीत तब्बल २० टक्क्यांची घट झाली आहे. विशेष म्हणजे, दुचाकीखरेदीला मोठा फटका बसला असून, चारचाकींच्या नोंदणीत मात्र दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या वाहनखरेदीच्या पसंतीत बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
दुचाकींना मोठा फटका, कारना तेजी
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत तीन हजार ७९५ वाहनांची नोंदणी झाली. गतवर्षी याच सणासुदीच्या कालावधीत चार हजार ७५९ वाहनांची नोंद झाली होती. म्हणजेच यंदा ९६४ वाहनांची नोंदणी कमी झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडण्याऐवजी बाजारातील प्रतिसाद कमी झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दुचाकींच्या बाजारपेठेला यंदा सर्वाधिक झळ बसली आहे. गतवर्षी १३ ते २२ ऑक्टोबरदरम्यान तीन हजार ५१९ दुचाकींची नोंदणी झाली होती. यंदा मात्र अवघ्या एक हजार ५६५ दुचाकींची नोंद झाली. तब्बल एक हजार ९५४ दुचाकींची घट म्हणजेच ५५ टक्क्यांची घसरण झाली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुचाकींच्या खरेदीत झालेली ही घट विशेष लक्षवेधी ठरली आहे. याउलट कारच्या बाजारपेठेत तेजीचे चित्र आहे. गतवर्षी ५७७ कारची नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा एक हजार ३४९ वर पोहोचला आहे. इतर वाहनांच्या नोंदणीतही ६६३ वरून ८८१ पर्यंत वाढ झाली आहे.
लक्ष्मीपूजनाला निराशाजनक प्रतिसाद
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा विशेष कल असतो. मात्र, यंदा या शुभमुहूर्तावरही ठाणेकरांचा प्रतिसाद निराशाजनक राहिला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आरटीओमध्ये केवळ ३२ वाहनांची नोंदणी झाली. त्यामध्ये एक दुचाकी, १० कार आणि २१ इतर वाहनांचा समावेश होता. गतवर्षी याच दिवशी ५४९ वाहनांची नोंदणी झाली होती. त्यामुळे यंदाच्या लक्ष्मीपूजनाला वाहन खरेदीचा उत्साह जवळपास गायब झाल्याचे दिसून आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply