रेल्वे प्रवासात मिळत असलेल्या अन्नाच्या दर्जाबद्दल प्रवाशांच्या तक्रारी अनेकदा समोर येतात. कधी जेवणात अळ्या सापडतात, तर कधी आंबलेलं जेवण पुरवलं जातं. पॅण्ट्री कार तसेच रेल्वेच्या कंत्राटी ठेकेदारांकडून हे अन्न पुरवलं जातं. आता रेल्वेत दिल्या जात असलेल्या अन्नाच्या दर्जाबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ट्रेनच्या थर्ड एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेविषयी प्रश्न उभा राहिला आहे.
अर्धं जेवण झाल्यावर डाळीत स्क्रबर सापडला
थर्ड एसीमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशानं पॅण्ट्री कारमधून १५० रुपयांची थाळी खरेदी केली. मात्र त्या थाळीत भांडी घासायचा लोखंडी तारेचा स्क्रबर सापडेल, याचा त्याला अंदाजही नव्हता. या घटनेमुळे प्रवाशाला मोठा धक्का बसला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसतं की, प्रवासी आपल्या सीटवर बसून जेवण करत होता. अर्धं जेवण संपल्यावर त्यानं वाटीतून डाळ उचलली, तेव्हा त्यात लोखंडी तारेची जाळी पडलेली होती. हे पाहून प्रवाशाला धक्काच बसला. त्यानं लगेच याचा व्हिडीओ तयार केला. जेव्हा प्रवाशानं पॅण्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ही गोष्ट सांगितली, तेव्हा त्यांनी हे प्रकरण इथेच मिटवण्याचा सल्ला दिला. ‘सर, तुम्ही ही थाळी सोडा आणि आम्ही तुम्हाला दुसरी थाळी आणून देतो,’ असं कर्मचारी प्रवाशाला समजावू लागले. मात्र प्रवाशानं दुसरी थाळी घेण्यास साफ नकार दिला आणि रेल्वेविरोधात तक्रार करण्याचा इरादा बोलून दाखवला.
सोशल मीडियावर संतापाची लाट
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यावर लोकांचा राग वाढला आणि रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर अनेकांनी टीका केली. अनेकांनी रेल्वे सेवा आणि आयआरसीटीसीच्या कॅटरिंग सेवेवर आपला राग काढला. एका युजरनं लिहिलं की, १५० रुपयांच्या डाळ-भातासोबत लोखंडाचं ‘एक्स्ट्रा न्यूट्रिशन’ मोफत दिलं जात आहे. रेल्वेनं निष्काळजीपणाची हद्द केली आहे, अशी टीकाही झाली.
दुसऱ्या एका युजरनं लिहिलं की, जर हे चुकून पोटात गेलं असतं तर प्रवाशाच्या जीवावर बेतलं असतं. अशा पॅण्ट्री कारचं लायसन्स तातडीनं रद्द व्हायला हवं. अनेक लोकांनी रेल्वे मंत्रालयाला टॅग करत पॅण्ट्री कारमध्ये स्वच्छतेच्या मानकांची कठोर तपासणी केली जावी, अशी मागणी केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply