धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या विविध मागण्यांसाठी ‘धारावी बचाव आंदोलना’तर्फे २५ नोव्हेंबरला आझाद मैदान येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.
धारावीतील पीएमजीपी कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात ६ नोव्हेंबरला आंदोलनाच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत महामोर्चाचा निर्णय घेण्यात आला.
रहिवाशांच्या प्रमुख मागण्या
धारावी पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचे पात्र, अपात्र आणि अनिर्णित असे वर्गीकरण न करता सर्व रहिवाशांना पात्र ठरवावे आणि धारावीतच घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांची, तर मुंबई महापालिकेच्या चाळी आणि एसआरए इमारतींतील रहिवाशांना ७५० चौरस फुटांची घरे देण्याची मागणीही करण्यात आली.
याशिवाय धारावीतील दुकाने, व्यवसाय आणि उत्पादन घटकांसाठी परिसरातच व्यापारी संकुले उभारावीत. तसेच मंदिरे, मशिदी, चर्च, शाळा, महाविद्यालये आणि मैदानांसाठीही योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात येणार आहेत.
मोर्चाच्या तयारीसाठी बैठका
महामोर्चात सहभागी होण्यासाठी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि काँग्रेसच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार असून, खासदार अनिल देसाई मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीला माजी आमदार बाबुराव माने, कॉम्रेड राजू कोरडे, नसिरुल हक, उल्लेश गजकोश, पॉल राफेल, वसंत खंदारे, डॉ. जावेद खान, कलाम खान आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply