उरण शहरातील आगरी-कोळी संस्कृती आणि स्थानिक कलांचे जतन करण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. केंद्रासाठी आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे भवन वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
२० गुंठ्यांत विविध सुविधा
उरण शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन उपलब्ध नाही. त्यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर मर्यादा येत आहेत. शहरातील एकमेव राजीव गांधी टाऊन हॉलचे कामही रखडल्याने या अडचणीत भर पडली आहे. ही गरज लक्षात घेऊन नगर परिषदेने सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
नगर परिषद कार्यालयाच्या मागील बाजूस २० गुंठे जागेत हे केंद्र उभारले जात आहे. यामध्ये सेंट्रल प्लाझा, कला दालन, सभागृह आणि व्यापारी संकुल अशा सुविधांचा समावेश असेल. स्थानिक आगरी-कोळी संस्कृतीचे दर्शन घडवण्यासह तिचे जतन करण्यावर भर दिला जाणार आहे. मंजूर निधीतून हे काम शक्य तितक्या लवकर, म्हणजेच एका वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती नगर परिषदेचे शहर अभियंता निखिल दोरे यांनी दिली.
स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ
स्वतंत्र सभागृह आणि कला दालन उपलब्ध झाल्यामुळे उरणमधील स्थानिक कलाकार, सांस्कृतिक संस्था आणि नागरिकांना कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी जागा मिळू शकेल. तसेच स्थानिक परंपरा, कला आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. मात्र प्रकल्पाचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply