राज्याच्या ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुणे अन्न व औषध प्रशासनाकडून वानवडी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. वानवडीमधील दोन कराची स्वीट्स उत्पादक युनिटांवर धडक कारवाई करत त्यांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या मिठाई विक्रेत्यांवर यापुढेही असाच कडक बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
छाप्यात काय जप्त झाले?
१० नोव्हेंबर २०२६ रोजी मेसर्स माँ कराची स्वीट्स मार्ट आणि मेसर्स श्री मोहन कराची स्वीट्स मार्ट या दोन युनिटांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापे टाकले. या कारवाईत एकूण ९३ किलो संशयास्पद मिठाई जप्त करण्यात आली. माँ कराची स्वीट्स मार्ट या ठिकाणावरून १८ किलो मोतीचूर लाडू आणि ५ किलो बर्फी, असे एकूण २३ किलो मिठाई जप्त करण्यात आली. श्री मोहन कराची स्वीट्स मार्ट या युनिटमधून ४१ किलो मोतीचूर बुंदी आणि २९ किलो बर्फी, असा एकूण ७० किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला.
परवाने निलंबित, नमुने तपासणीसाठी
दोन्ही युनिटमधील मिठाईचा साठा कमी दर्जाचा किंवा आरोग्यास अपायकारक असण्याच्या संशयावरून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. जप्त करण्यात आलेला साठा नाशवंत स्वरूपाचा असल्याने कायदेशीर प्रक्रियेनुसार तो जागेवरच नष्ट करण्यात आला. या कारवाईत एकूण ५०,८६० रुपये किमतीचा साठा नष्ट करण्यात आला असून अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही युनिटांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी पी. एन. चव्हाण आणि पी. जे. जाधव यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. सहाय्यक आयुक्त एन. बी. खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह आयुक्त एस. आर. करकळे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पुणे शहरातील इतर मिठाई व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply