देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट, अर्थात एमसीएलआर वाढवला आहे. बँकेने सर्व मुदतींच्या एमसीएलआरमध्ये ५ ते १५ बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. नवीन दर ७ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. बँकेच्या या निर्णयाने होम लोन, पर्सनल लोन आणि इतर कर्ज महागणार आहेत.
किती वाढ झाली?
बँकेने सहा महिने, एक वर्ष, दोन वर्ष आणि तीन वर्ष मुदतीच्या एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. बाकी मुदतींच्या एमसीएलआरमध्ये ५ ते १० बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे. एका बेसिस पॉइंटचा अर्थ ०.०१ टक्के होतो. या बदलामुळे एचडीएफसी बँकेचा एमसीएलआर ७.७५ ते ८.५५ टक्क्यांवरून ७.८५ ते ८.७० टक्क्यांपर्यंत गेला आहे. बँकेने दीर्घ मुदतीच्या एमसीएलआरमध्येही वाढ केली आहे.
तुमच्या ईएमआयवर काय परिणाम होणार?
ज्यांचं कर्ज एमसीएलआरशी जोडलेलं आहे, त्यांनाच या वाढीचा फटका बसणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही २० लाख रुपयांचं कर्ज २० वर्षांसाठी घेतलं असेल आणि त्याचं व्याज ८ टक्के असेल, तर व्याज वाढून ८.१५ टक्के होईल. ८ टक्के व्याजावर तुमचा ईएमआय १६,७२९ रुपये आहे, तर ८.१५ टक्के झाल्याने दरमहा हप्ता १६,९१६ रुपये होणार आहे. म्हणजे महिन्याच्या हप्त्यात सुमारे २०० रुपयांची वाढ होणार आहे. एमसीएलआरच्या वाढीमुळे ज्या ग्राहकांचे होम लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन आणि इतर फ्लोटिंग रेट कर्जाचे व्याज एमसीएलआरशी जोडलेले आहे, त्यांना अधिक फटका बसणार आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की सर्व ग्राहकांच्या कर्जात वाढ होईल. ग्राहकांचं कर्ज किती वाढेल, हे त्या ग्राहकांचं कर्ज कोणत्या बेंचमार्कशी संबंधित आहे आणि कर्ज करारातील व्याजदर रिसेटची तारीख काय आहे, यावरही अवलंबून आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply