काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे बहुचर्चित आत्मचरित्र ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आले आहे. या पुस्तकात सोनिया गांधींनी गांधी कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते भारतातील सहा दशकांच्या प्रवासाची कहाणी मांडली आहे. देशाच्या राजकारणातील अनेक मोठ्या घडामोडींवर त्यांनी मोकळेपणाने भाष्य केले आहे.
आणीबाणीबाबत स्पष्ट भूमिका
१९७५ मध्ये लावलेली आणीबाणी ही इंदिरा गांधींची चूक होती, असे विधान सोनिया गांधींनी आत्मचरित्रात केले आहे. संजय गांधी यांना नियंत्रणात ठेवले असते, तर आणीबाणीनंतरचे बरेच नुकसान टाळता आले असते, अशी सोनिया गांधींची भूमिका आहे. राजीव गांधी आणीबाणीच्या निर्णयाच्या विरोधात होते, असेही सोनिया गांधींनी लिहिले आहे.
२००४ मध्ये पंतप्रधानपदाचा नकार का?
२००४ साली यूपीएच्या विजयानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधानपदासाठी नकार का दिला, याबद्दलही आत्मचरित्रात सोनिया गांधी म्हणतात. आजी इंदिरा आणि वडील राजीव यांच्या हत्येनंतर आईलाही गमावण्याची भीती मुलांना वाटत होती. त्यामुळेच सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाच्या आग्रहाला नकार दिला.
दरम्यान, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर प्रेमापोटी सोनिया गांधींनी राजीव गांधींना राजकारणात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव यांच्याबाबतही त्यांना भीती वाटत होती. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कुटुंबावर झालेल्या परिणामांचे भावनिक वर्णनही पुस्तकात आहे. राजीव गांधींच्या काही चुकांबद्दलही सोनिया गांधींनी या पुस्तकात लिहिले आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदींसोबत वैयक्तिक पातळीवर प्रत्यक्ष संवाद कमी असला, तरी काही मुद्द्यांवर विचारांचे साम्य असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
एकंदरित सोनिया गांधींच्या या आत्मचरित्राने एकाच वेळी गांधी कुटुंबाच्या वेदना, राजकीय संघर्षाचे अंतरंग आणि इतिहासातील काही वादग्रस्त प्रकरणांवर नवा प्रकाश टाकला आहे. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ मुळे देशाच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply