गूळ हा भारतीय आहार आणि घरगुती उपायांचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. गुळाचे सेवन केल्याने गळा स्वच्छ होण्यास, खोकला कमी होण्यास आणि श्वास घेण्यास आराम मिळण्यास मदत होते, असे मानले जाते. याशिवाय तुळशीला देखील फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु गूळ आणि तुळशीचे एकत्रीत सेवन केल्याने खरोखरच फुफ्फुसे साफ होतात का, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
गुळात आणि तुळशीत कोणते गुणधर्म असतात
गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स थोडेफार प्रमाणात आढळतात. काही लोकांना गूळ खाल्ल्याने कफ आणि गळ्यातील जळजळ यांपासून आराम मिळाल्याचे जाणवते. तथापि गूळ हा साखरेचाच एक प्रकार आहे आणि त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. पारंपरिक उपचारांमध्ये तुळशीचा वापर खूप आधीपासून केला जात आहे. खोकला, सर्दी आणि श्वासाशी संबंधित समस्यांमध्ये याचा वापर होतो. तुळशीमध्ये जळजळ कमी करणारे, संसर्गाशी लढणारे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. काही अभ्यासांमध्ये तुळशीच्या सेवनामुळे श्वासनलिकेला आराम मिळणे, छातीत साचलेला कफ कमी होणे आणि श्वास घेणे सोपे होणे यांसारख्या गोष्टी समोर आल्या आहेत.
फुफ्फुसे खरोखरच साफ होतात का?
डॉक्टरांच्या मते, गूळ किंवा तुळशीचे सेवन केल्याने फुफ्फुसे डिटॉक्स होतात किंवा त्यात साचलेले प्रदूषक कण बाहेर पडतात, हा एक गैरसमज आहे. गूळ किंवा तुळशीमुळे फुफ्फुसे साफ होऊ शकतात किंवा वायुप्रदूषणामुळे झालेला त्रास भरून निघू शकतो, याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे अस्तित्वात नाहीत. तुळशीमध्ये काही फायदेशीर घटक आणि गुळामध्ये खनिजे असली, तरी ते शरीराला अतिसूक्ष्म विषारी प्रदूषण कणांपासून वाचवणारे संरक्षक कवच म्हणून काम करत नाहीत. आपल्या फुफ्फुसांमध्ये श्वासासोबत आत जाणाऱ्या कणांचा सामना करण्याची नैसर्गिक यंत्रणा असते. फुफ्फुसांमधील कफ आणि ‘सिलिया’ नावाचे बारीक केसांसारखे घटक श्वासावाटे गेलेले कण रोखण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करतात. मात्र दीर्घकाळ प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिल्याने शरीराची ही नैसर्गिक सुरक्षा यंत्रणा कोलमडू शकते. गूळ आणि तुळशीचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात करू शकता. यामुळे गळ्याची जळजळ, सौम्य खोकला किंवा कफ यांसारख्या समस्यांमध्ये नक्कीच आराम मिळू शकतो, परंतु प्रदूषणाचे कण फुफ्फुसातून बाहेर काढण्याचे काम ते करत नाहीत. ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply