दिवाळीच्या उत्सवादरम्यान मुंबईमध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मुंबईत सोमवारी आगीच्या तीन घटना घडल्या. त्यात मालवणीतील एका घटनेत एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला, तर इतर दोन घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मालवणीत फटाक्यांच्या दुकानाला आग
मालवणी गेट क्रमांक सात परिसरात फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. आगीत मृत व्यक्तीचा मृतदेह जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अंधेरी आणि ओशिवरा येथील आग
दुसरी घटना अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात घडली. सुंदरवन परिसरातील पूर्णा इमारतीला आग लागली. इमारतीत आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
तिसरी घटना ओशिवरा परिसरात घडली. महेश्वरी भवनच्या टेरेसवर आग लागली. इमारतीच्या छतावर उभारण्यात आलेल्या स्कॅफोल्डिंगला आग लागली होती. आगीमुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply