भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे खेळला जात आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. हॅमिल्टनमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नाणेफेक नियोजित वेळेत होऊ शकली नाही. मात्र, आता नाणेफेक झाले असून भारताने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशीर झाल्याने सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या खेळणाऱ्या अकरा खेळाडूंमध्ये कोणताही बदल केलेला नाही; दुसऱ्या सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला आहे.
मालिका विजयाचा प्रयत्न
तिसरी लढत जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळवणे कर्णधार शुभमन गिलसाठीही महत्त्वाचे आहे, कारण तो अखेरच्या दोन सामन्यांत खेळणार नाही. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी त्याला लाल चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. वनडे मालिकेतील विजयी आघाडी भारतीय संघ आणि शुभमन गिल यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारी ठरेल. अखेरच्या दोन सामन्यांत संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यर भूषविणार असून हे दोन्ही सामने टॉरंगा येथे खेळले जातील. ईडन पार्कवरील विराट कोहलीच्या शानदार खेळीचा अपवाद वगळता कर्णधार शुभमन गिल, अनुभवी रोहित शर्मा आणि इतर फलंदाज वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांवर अडखळताना दिसले. गेल्या दोन सामन्यांमध्ये ० आणि २३ धावा करणाऱ्या रोहित शर्माला आपला जुना फॉर्म परत मिळवावा लागेल. सेडन पार्कवर रंगणाऱ्या तिसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला मैदान कर्मचाऱ्यांना पाऊस येण्यापूर्वी खेळपट्टी तयार करण्यासाठी अवघा अर्धा दिवस मिळाला. त्यामुळे भारतीय संघालाही बंदिस्त सुविधांमध्येच सराव करावा लागला. सामन्याच्या दिवशीही पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वातावरण, हवामान आणि खेळपट्टीवरील ओलावा यामुळे नाणेफेक नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाची ठरेल; अशा परिस्थितीत आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघांना फायदा होतो.
प्रतिस्पर्ध्याच्या गोटातून आणि दोन्ही संघांची प्लेइंग ११
न्यूझीलंडची आपल्या घरच्या मैदानावरील कामगिरी अपेक्षेनुसार राहिलेली नाही. पहिल्या दोन सामन्यांत न्यूझीलंडचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले, त्यामुळे गोलंदाजांवर अतिरिक्त दबाव आला आहे. डेवॉन कॉनवेच्या कनकशनमुळे आणि राचिन रविंद्रच्या दुखापतीमुळे यजमान संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन अशी आहे: विल यंग, टिम सेफर्ट, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, मॅथ्यू फिशर. भारताची प्लेइंग इलेव्हन अशी आहे: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नमन धीर, अंशुल कंबोज, औकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply