दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त तनिष्का व्यासपीठातर्फे ‘दिवाळी पहाट : मैफील सप्तसुरांची’ हा संगीत सोहळा भक्तिमय वातावरणात रविवारी छत्रपती संभाजीनगरातील तापडिया नाट्यमंदिरात झाला. प्रसिद्ध गायक लक्ष्मीकांत काळे, नगरसेवक राजू वैद्य आणि डॉ. राजीव नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन झाले.
गणेश वंदना, भक्तिगीते, विठ्ठल भक्तिपर गीते तसेच मनाला भावणाऱ्या भावगीतांची सुंदर गुंफण सादर करण्यात आली. भक्तिरसाने भारावलेले वातावरण, सुरेल स्वरांची बरसात आणि गायकांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. पहाटेच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात भक्ती, संगीत आणि भावनांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
अनघा काळे यांच्या गायनाने मैफलीत रंगत
प्रसिद्ध गायिका अनघा काळे आणि त्यांच्या समूहाने आपल्या दमदार आणि सुरेल गायनाने मैफलीत रंगत आणली. त्यांना मिलिंद डोलारे आणि गौरव पवार यांनी गायनाची साथ दिली. वाद्यवृंदात राजू जगधने, अंकुश बोद्रे, गिरीश काळे, विनोद व्हावळे आणि जितेंद्र साळवी यांनी सुरेल साथसंगत केली. महेश अचिंतलवार यांनी सूत्रसंचालन केले.
विनामूल्य प्रवेश; संगीतप्रेमींचा मोठा प्रतिसाद
कार्यक्रमासाठी तनिष्का व्यासपीठाच्या जिल्हा समन्वयक श्रुती काटे आणि तनिष्का प्रतिनिधी अंजली गोरे यांनी योगदान दिले. विनामूल्य प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply