लोणी (ता. राहाता) येथे आयोजित ‘दिवाळी पहाट’ या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्ह्यातील उदयोन्मुख गायकांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून दिवाळीची पहाट प्रसन्न केली. या मैफलीत ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मातीमध्ये दरवळणारे’, ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘घेई छंद मकरंद’ आणि ‘स्वामी कृपा कधी करणार’ अशा विविध लोकप्रिय नाट्यगीत, भावगीत आणि भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ
संकेत दरकदार, स्नेहा निर्मळ, दीपक वाघ, दुर्गा आगाशे यांच्यासह ज्येष्ठ गिटार वादक प्रदीप अडवणकर, तबला वादक अनिल डोळे, नकुल भगत, पखवाज वादक हनुमान बैरागी आणि की-बोर्डवर नरेंद्र साळवे या कलाकारांनी कार्यक्रमात रंग भरले. या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गायक आणि वादक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. या प्रसंगी ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, किसन विखे पाटील, विजय लगड, भारत घोगरे यांच्यासह ग्रामस्थ आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply