येवला तालुक्यातील कोळगाव शिवारात दिवाळीच्या मध्यरात्री चोरीची घटना घडली. गिडगे वस्तीवरील शेतकऱ्याच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. मात्र, घरातील तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे एका चोरट्याला जागीच पकडण्यात आले, तर अन्य तिघांनी पळ काढला.
मध्यरात्री घरात प्रवेश
कोळगाव येथील अरुण भागाजी गिडगे हे ममदापूर परिसरातील मुंढे वस्तीवर राहतात. रविवारी, ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सुमारे तीन वाजता चोरट्यांनी घराचा बाजूचा दरवाजा आणि कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. लक्ष्मीपूजनासाठी मांडलेल्या पूजेच्या पाटावर ठेवलेली अडीच लाख रुपयांची रोकड, चांदीची चैन आणि इतर दागिने चोरट्यांनी उचलले.
तरुणाचे धाडस; चोरटा पकडला
चोरट्यांची चाहूल लागताच तेजस गिडगे याला जाग आली. त्याने पळणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. रोकड असलेली पिशवी घेऊन जाणाऱ्या चोरट्याने तेजसला लाथ मारून झटापट केली आणि तेथून पळ काढला. मात्र, दुसऱ्या चोरट्याला तेजसने घट्ट पकडून ठेवले. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे हा थरार सुरू राहिला. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पकडलेल्या चोरट्याला दोरीने बांधून ठेवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. अन्य तिघे चोरटे फरार आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply