लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे केल्यानंतर उर्वरित दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी चाकरमानी त्यांच्या मूळ गावाकडे निघाले आहेत. यामुळे नाशिक शहरातील बसस्थानके गजबजली आहेत. रेल्वेस्थानकही गर्दीने फुलून गेले आहे.
बसस्थानके आणि रेल्वेस्थानकावर गर्दी
ठक्कर बाजार, महामार्ग तसेच नवीन मेळा बसस्थानक गर्दीने फुलून गेले आहेत. जिल्ह्यांतर्गत पेठ-कळवण, सुरगाणा तसेच मालेगावकडे जाणाऱ्या बसगाड्या भरून जात होत्या. मुंबई व पुणे मार्गावर तसेच कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, इंदूर आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. परजिल्ह्यात विशेष करून धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच मराठवाड्याकडे धावणाऱ्या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती. प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने काही मार्गांवर विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरही दिवसभर प्रवाशांची लगबग पाहायला मिळाली. धुळे-जळगावसोबत मराठवाड्याकडील रेल्वेगाड्यांना गर्दी होती.
परप्रांतीयांची गावाकडे धाव
रोजगारासाठी महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले परप्रांतीयही गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशसह दिल्ली व पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या भरभरून जात होत्या. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत मध्य रेल्वेने बिहार व उत्तर प्रदेशासाठी विशेष रेल्वे सोडल्या आहेत. मात्र, या रेल्वेगाड्यांचे तिकीट मिळवतानाही प्रवाशांची दमछाक होत आहे. रेल्वे तसेच बसगाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेत बहुतांश प्रवाशांची पावले खासगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. धुळे, नंदुरबार, जळगावसह छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या मार्गावरील ट्रॅव्हल्सला प्रवाशांची पसंती मिळत असल्याने अवघ्या काही तासांत बस हाऊसफुल्ल होत आहेत.
विमानसेवेला प्राधान्य
नाशिककरांनी यंदाच्या दिवाळीमध्ये देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देताना खास विमानप्रवासाचा बेत आखला आहे. नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीच्या सकाळ व रात्रीच्या सेवेसह हैदराबाद, बंगळुरू व अहमदाबाद या सेवांना पसंती मिळते आहे. विमानाने अवघ्या तासात नवी दिल्ली गाठून तेथून कनेक्टेड फ्लाइटने जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि उत्तराखंडला जाण्याचे प्लॅनिंग नाशिककरांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply