पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथे आमदार मोनिका राजळे यांनी ऊसतोड मजुरांसमवेत दिवाळी साजरी केली. वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या ऊसतोड मजुरांच्या पालावर जाऊन राजळे यांनी त्यांच्यासोबत सणाचा आनंद वाटला. यावेळी त्यांनी मजुरांना फराळ दिला, तर महिला कामगारांना साडी भेट म्हणून दिली. कामगारांच्या झोपडीत बसून चहापान करत त्यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
मजुरांच्या सुख-दुःखाची विचारपूस
पिराजी आत्माराम कीर्तने यांच्या कुटुंबातील महिला ऊसतोड कामगारांनी राजळे यांचे आपुलकीने स्वागत केले. त्यांच्या कोपीत चहा घेत राजळे यांनी कामगारांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. नारायण दहिफळे यांच्या कोपीत जाऊनही त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर प्रापंचिक अडीअडचणी आणि इतर समस्यांबाबत चर्चा केली.
मुलींच्या शिक्षणाचे आवाहन
यावेळी राजळे यांनी मुलींचे कमी वयात लग्न करू नका, असे आवाहन केले. अठरा वर्षांपूर्वी मुलींना विवाहबंधनात अडकवू नये, असे त्यांनी सांगितले. आज महिलांना ज्या कष्टमय परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, ती परिस्थिती आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये, यासाठी त्यांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करावे, असे आवाहन त्यांनी केले. सध्या दुष्काळाची तीव्रता मोठी असली, तरी शासन मजुरांच्या पाठीशी आहे, असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने पाच हजार रुपयांची मदत दिली असून, पुढील वर्षीही दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब किलबिले, संचालक राहुल राजळे, उद्धव वाघ, श्रीकांत मिसाळ, रामकिसन काकडे, बाळासाहेब गोल्हार, नारायण काकडे, सचिन लोखंडे, कुशिनाथ बर्डे, बापूसाहेब पाटेकर, दीपक अंदुरे, रवींद्र महाजन आणि विनायक म्हस्के उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply