टिटवाळा रेल्वे स्थानक ते निमकर नाका या मार्गावर बेशिस्त दुचाकी पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अडचणी येत आहेत. वारंवार वाहतूक कोंडी होत असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
दररोज दंडात्मक कारवाईची मागणी
अनधिकृत पार्किंगविरोधात दररोज दंडात्मक कारवाई करून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दुचाकी उचलून न्याव्यात, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनंजय पोरे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे उपाध्यक्ष ॲड. अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके आणि रोहित जोशी उपस्थित होते.
स्थानक परिसरात अधूनमधून कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी दररोज नियमित दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दंड आकारून गरजेनुसार ती उचलून न्यावीत, वाहतूक पोलिसांची नियमित गस्त ठेवावी आणि प्रतिबंधित पार्किंग क्षेत्र निश्चित करून ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज
टिटवाळ्यात वाहनांची संख्या वाढत असताना त्या तुलनेत पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने समस्या अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे मनसेच्या निवेदनानंतर पोलिस प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे टिटवाळावासीयांचे लक्ष लागले आहे.
पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि आपत्कालीन सेवांसाठी रस्ते मोकळे ठेवणे गरजेचे आहे. रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांना या मार्गावरून ये-जा करताना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही मनसेने केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply