स्ट्रोक अचानक येतो असे वाटत असले, तरी त्याआधी शरीर काही संकेत देऊ लागते. स्ट्रोक येण्याच्या साधारण एक महिना आधी शरीरात काही धोक्याची लक्षणे दिसू शकतात. ही चिन्हे वेळीच ओळखली आणि त्याकडे लक्ष दिले, तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. मात्र अनेकदा ही लक्षणे किरकोळ वाटून त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
चेहरा, हात-पाय आणि बोलण्यातील बदल
हसण्याचा प्रयत्न करताना चेहऱ्याची एक बाजू बधीर किंवा जड वाटू लागते. चेहरा असमान दिसायला लागतो, जणू एका बाजूला झुकलेला आहे. शरीराची एक बाजू कमकुवत किंवा बधीर वाटू शकते. हात वर केल्यास तो खाली पडू शकतो किंवा पूर्णपणे निर्जीव वाटू शकतो आणि शरीरात अशक्तपणा जाणवतो. बोलताना शब्द अडखळणे, अस्पष्ट बोलणे किंवा वाक्ये तयार करताना त्रास होणे, अशी लक्षणेही दिसू शकतात. ही चिन्हे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
दृष्टी, गोंधळ आणि डोकेदुखीकडे लक्ष द्या
अचानक अंधुक दिसणे, दुहेरी दिसणे किंवा एका किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी अंशतः किंवा पूर्णपणे जाणे, ही दृष्टीशी संबंधित लक्षणे आहेत. झोपेतून उठल्यावर गोंधळल्यासारखे वाटणे, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञता असणे किंवा साध्या सूचना न समजणे, असेही होऊ शकते. तीव्र अस्थिरता जाणवणे, शरीराच्या हालचालींवरील ताबा अचानक सुटणे किंवा अंथरुणातून उठताना उभे राहण्यास त्रास होणे, ही चक्कर येण्याची लक्षणे आहेत. तीव्र आणि अनाकलनीय डोकेदुखीमुळे झोपमोड होऊ शकते किंवा डोळे उघडताच ती जाणवू शकते; फिट्सही येऊ शकतात.
वरील माहिती केवळ माहितीसाठी आहे. कोणतेही उपचार, आहार आणि औषधे तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply