कोल्हापुरात गोकुळ दूध संघावरून सुरू असलेले राजकारण आता अधिकच तापले आहे. गोकुळच्या शासनाने नियुक्त केलेल्या संचालकाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.
मोर्चात सहभागी झालेल्या प्रचंड जनसमुदायाकडे लक्ष वेधत शेट्टी म्हणाले की, पाच हजार ठरावधारकांना हाताशी धरून गोकुळवर ताबा मिळवता येईल, असा काहींना अंदाज होता. मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण हे कोल्हापूर आहे, असे त्यांनी ठणकावले. त्यानंतर कोरमचे कारण पुढे करून बैठका पुढे ढकलण्याचा डाव रचला गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
सहकाराचा इतिहास आणि स्वीकृत संचालकांचा प्रश्न
शेट्टी यांनी सहकार चळवळीचा जुना इतिहास सांगताना वैकुंठराव मेहता, विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांसारख्या नेत्यांनी सहकाराची पाळेमुळे रोवली होती, असे नमूद केले. सहकारी संस्थांमध्ये स्वीकृत सदस्यांची तरतूद त्याच काळात करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सहकाराच्या कायद्यानुसार लोकांमधून निवडून आलेले संचालक असतात. एखाद्या विषयातील तज्ज्ञ नसल्यास संचालकांना योग्य निर्णय घेता यावा आणि कायदेशीर सल्ला मिळावा, यासाठी स्वीकृत संचालकांची संकल्पना आणली गेली. पण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात कुठेही स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही, असे शेट्टी म्हणाले. गुजरातमध्ये 2020 साली असाच प्रयत्न झाला होता, तो हाणून पाडण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.
न्यायालयीन सुनावणी आणि इशारा
या प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू असून, न्यायालयात आजचा संदेश पोहोचला आहे, असे शेट्टी म्हणाले. न्यायालयाने राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून निर्णय दिला, तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. न्यायालयाने ड्रोनवरून छायाचित्रे मागवून घ्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली. मोर्चात आलेले लोक भाड्याने आणलेले नाहीत, तर गोकुळ वाचवण्यासाठी आले आहेत, असे ते म्हणाले.
कोल्हापूरकरांनी ठरवल्यास काय होऊ शकते, याची उदाहरणे देताना शेट्टी म्हणाले की, येथे एकदा टोल आणला गेला होता, तो घालवण्यात आला. आठ हजार कोटी रुपयांचा अदानी पॉवर प्रकल्प आणला होता, तोही पळवून लावण्यात आला. नाशिकचे पाणी गुजरातला गेले, माधुरी हत्ती गुजरातला नेण्यात आली, तीही परत आणली गेली. हा कोल्हापूर जिल्हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे, असे सांगत त्यांनी गोकुळ निवडणुकीची अधिसूचना पुन्हा एकदा वाचावी, असे आवाहन केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply