दिवाळी हा आनंद, उत्साह आणि कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा सण. मात्र जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील काही परिचारिका दिवाळीच्या दिवशीही कुटुंबापासून दूर राहून रुग्णांची सेवा करीत आहेत. घरातील सणाचा उत्साह बाजूला ठेवून त्या रुग्णांच्या सेवेत तत्पर आहेत.
रुग्णांची काळजी हेच प्राधान्य
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी दिवाळीच्या दिवशीही औषधोपचार, तपासण्या आणि काळजी घेण्याचे काम नेहमीप्रमाणेच सुरू आहे. या कामात परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णांच्या वेदना समजून घेणे, वेळेवर औषधे देणे, डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे, रुग्णांना धीर देणे आणि त्यांच्या नातेवाइकांना आधार देणे, अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत.
सेवाच खरी दिवाळी
रुग्णांची सेवा हेच ईश्वरसेवेचे व्रत आपण घेतले आहे आणि सण असो वा नसो, कर्तव्याला प्राधान्य दिले जाते, अशी भावना निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत पाटील, परिचारिका ज्योती आमटे, गायत्री लांघी आणि समाधान बाविस्कर यांनी व्यक्त केली. परिचारिका मोहिनी फड यांचे कुटुंबीय आंबेजोगाईला असून, त्या रुग्णसेवेलाच आपली दिवाळी मानतात. परिचारिका प्रणिता यांनाही ड्यूटीमुळे कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करता आली नाही; मात्र आपल्या सेवेमुळे रुग्ण लवकर बरे होत असतील, तर त्यातच आपल्या दिवाळीचा आनंद असल्याचे त्या मानतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply