मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून राज्यात ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. पुढील वर्षीच्या मार्चअखेरपर्यंत १०० टक्के कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
सोळा हजार मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प
राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही केंद्राच्या पीएम कुसुम योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १६ हजार मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प विकेंद्रित स्वरूपात उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत सुमारे सात हजार मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यातून उपलब्ध होणारी वीज आणि अन्य तांत्रिक उपायांच्या आधारे आता ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू आहे. सर्व कृषिपंपांना दिवसा सौरऊर्जेचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सौर कृषी पंपांत राज्य आघाडीवर
सौर कृषी पंप बसवण्यात राज्याने देशात आघाडी घेतली असून, देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी ६५ टक्के सौर कृषी पंप राज्यात बसवण्यात आले आहेत. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे साधन मिळत आहे. त्यांना हवे तेव्हा सिंचन करता येत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. सोबतच शेतीची उत्पादकताही वाढत असल्याचा अनुभव येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply