दिवाळीचा सण सुरू होऊनही मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत काम करणाऱ्या रोजंदारी, बहुउद्देशीय आणि कंत्राटी कामगारांना यंदाचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. वर्षभर सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा बोनसचा प्रस्ताव अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांच्या खात्यात २ नोव्हेंबर रोजी सानुग्रह अनुदान जमा झाले. मात्र त्याच वेळी रोजंदारी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र बोनस मिळाला नाही. सणाच्या काळात ही रक्कम हाती येईल, अशी अपेक्षा असताना केवळ आश्वासने मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
बोनसचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, सीटीसी बोरीवली रुग्णालयातील कर्मचारी, आरसीएच-२, एनयूएचएम, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, अंशकालिक कर्मचारी, स्वच्छ मुंबई अभियान, समग्र शिक्षा अभियान तसेच क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे बोनस मंजुरीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
महापालिकेच्या परिपत्रकानुसार किमान वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनसपोटी ८.३३ टक्के म्हणजेच एका महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम देण्याची तरतूद आहे. असे असतानाही प्रशासनाकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा आरोप म्युनिसिपल मजदूर युनियनने केला आहे.
१३ नोव्हेंबरला निषेधाचा इशारा
याप्रकरणी युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी प्रशासनाने तातडीने बोनस मंजूर करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा १३ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पणत्या लावून निषेध नोंदविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply