कर्जत तालुक्यातील पाली सायडोंगर गावातील ग्रामस्थांना आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी केले आहे. जमीन वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र राहून संघर्ष करण्याचा संदेश त्यांनी दिला. गावातील शिव मंदिरात स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले.
पाली सायडोंगर येथे होत असलेल्या हायड्रॉलिक प्रकल्पासाठी तुम्ही जमिनी देऊ नका, एकत्र राहू या, बाकी आम्ही बघतो, असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या जंगलतोडीविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून आवाज उठवणारे सयाजी शिंदे जंगलतोड सुरू असलेल्या पालीकडील कोतवाल खलाटी ग्रामपंचायतमधील सायडोंगर येथे आले होते. त्यावेळी पाली कोतवाल खलाटी ग्रामपंचायत ग्रामसवर्धन समितीने त्यांचे स्वागत केले. यावेळी कर्जत पर्यावरण बचाव समितीचे अॅड. कैलास मोरे, सह्याद्री बचाव समितीचे महेश भारती, माजी नगराध्यक्ष राजेश लाड आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
स्वतःचा अनुभव सांगत इशारा
ग्रामस्थांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना सयाजी शिंदे यांनी आपल्या गावाकडील आठवण सांगितली. आपण देखील प्रकल्पग्रस्त असून ४० वर्षांपूर्वी आपली जमीन धरणासाठी घेतली गेली, असे ते म्हणाले. त्यानंतर ३० वर्षे बदली जमीन मिळण्याची प्रतीक्षा करावी लागली. जमीन कागदावर दिली गेली, पण प्रत्यक्षात अजूनही जमीन मिळालेली नाही. त्यामुळे लहानशा तुकड्यासाठी आपल्या जीवाचा तुकडा देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
आता तुम्हाला २० लाख रुपये मिळतील, पण तुमची जमीन कोट्यवधींची आहे, असे त्यांनी सांगितले. जमीन आपली आई आहे, आपण आपल्या आईला विकणार का, असा सवाल त्यांनी केला. आम्ही धरणाला जागा देऊन शेकलो आहोत, आता तुम्हाला सावध करायला आलो आहे, असे ते म्हणाले. तुम्ही जमिनी देऊ नका, प्रकल्प येथून कसा पिटाळून लावायचा हे आम्ही पाहतो, असे सूचित करत मी तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
भारुडातून संदेश
शिव मंदिर येथे पर्यावरणप्रेमी रोहिदास लोभी हे स्वच्छतेचे दूत गाडगेबाबा बनून आले होते. त्यांनी जमिनी विकू नका, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशी अनेक उदाहरणे भारुड सादर करून दिली आणि प्रकल्प येथून हटवण्याचा आपला संकल्प यावेळी भारुडातून बोलून दाखवला. सर्व ग्रामस्थांनी यावेळी भारुड कार्यक्रमाला टाळ्यांची साथ देत सहभाग घेतला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply