मुंबई लोकलमधील किरकोळ वाद पुन्हा एकदा जीवघेणा ठरता ठरता राहिला. चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान एक प्रवासी धावत्या गाडीतून खाली कोसळला. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने त्याचा जीव वाचला.
शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास चर्चगेटवरून सुटलेल्या विरार फास्ट लोकलमध्ये ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान ही घटना घडली. लोकलच्या दरवाजात उभे राहण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन्ही प्रवाशांनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
वेग कमी असल्याने जीव वाचला
वाद विकोपाला गेला असतानाच मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून लोकल जात असताना मारहाणीदरम्यान एक प्रवासी अचानक धावत्या लोकलमधून थेट प्लॅटफॉर्मवर खाली पडला. सुदैवाने, स्थानकात प्रवेश करत असताना लोकलचा वेग कमी होता, त्यामुळे सदर प्रवासी गंभीर अपघातातून थोडक्यात बचावला आणि मोठा अनर्थ टळला.
व्हिडिओ व्हायरल; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घटनेदरम्यान डब्यात उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि वाढत्या वादाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांवर कडक कारवाई करावी आणि लोकल डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा वाढवावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply