नाशिकच्या द्वारका चौकात शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (एमएच १४, एनई ४७२४) रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्यांच्या साडीचा पदर बसच्या चाकात अडकला आणि त्या पुढील चाकाखाली सापडून फरफटत गेल्या. बस अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मृत महिला रेखा अरविंद जाधव असून त्या उपनगर येथील रहिवासी होत्या.
अपघात कसा घडला
ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. अपघात इतका भीषण होता की मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. मुंबई नाका पोलिसांनी परिसरातील रिक्षाचालकांच्या मदतीने मृतदेह बसखालून काढला. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
चालकाला ताब्यात घेतले
अपघात होताच बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पोपट माळोदे यांनी वडाळा नाका चौकातून चालकाला ताब्यात घेतले आणि मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकात रस्त्याच्या मधोमध अपघात घडल्याने नेमका गुन्हा कोण दाखल करणार यावर दोन्ही पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. अखेर अपघात मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे स्पष्ट झाल्याने तेथे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
डायरीमुळे ओळख पटली
रेखा जाधव यांच्याकडे एक पिशवी आणि एक पाकीट सापडले. पिशवीत लिंबू, टाचण्या यांसारख्या वस्तू होत्या, तर पाकिटात काही रक्कम आणि एक डायरी मिळाली. मुंबई नाका पोलिसांनी डायरीतील प्रत्येक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी महिलेस ओळखत नसल्याचे सांगितले. अखेर एका क्रमांकावरून जाधव कुटुंबीयांशी संपर्क झाला. त्या येवला येथील न्यायालयात एका प्रकरणासंदर्भात गेल्या होत्या, अशी माहिती मिळाली. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या अपघाताने जाधव कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply