राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख, ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांना भेटण्यासाठी राज्यातील नेते गर्दी करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्याचेही पाहायला मिळाले. या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
साहेबांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. साहेबांच्या प्रकृतीची ही चौकशी होती. साहेबांची प्रकृती अगदी छान आहे, त्यामुळे साहेबांनी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या, असे अमोल कोल्हे म्हणाले. दिवाळीनिमित्त ही भेट होणार होती, साहेबांची प्रकृती छान आहे. गप्पांमध्ये विषय निघत गेले, त्यामुळे त्या गप्पा रंगल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. साहेबांची प्रकृती छान आहे. महाराष्ट्रात साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा आनंद द्विगुणित व्हावा अशीही बातमी आहे, असेही कोल्हे म्हणाले. मात्र पार्थ पवार यांच्याशी माझी भेट झाली नाही, मला तर ते दिसले नाहीत. माझ्या साहेबांशी गप्पा झाल्या. विलीनीकरणाच्या फक्त माध्यमात चर्चा आहेत. या बातम्यांबाबत काहीही चर्चा झाली नाही. आतमध्ये सर्व ज्येष्ठ नेते एकत्र होते आणि गप्पांची मैफिल रंगली होती, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरणाच्या चर्चा का?
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. सुनील तटकरे यांचे विधान, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली शरद पवार यांची भेट, या सर्व घडामोडींमुळे विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अशातच आता पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय शिजतंय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply