केंद्र सरकारने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा पेट्रोलमध्ये जास्त इथेनॉल मिसळले जात असल्याचा गंभीर दावा कर्नाटक सरकारने केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून घेतलेल्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर हा अहवाल समोर आला असून, त्यामुळे वाहनचालकांना मिळणाऱ्या इंधनाच्या गुणवत्तेबाबत मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सात जिल्ह्यांतील १४ नमुन्यांची तपासणी
कर्नाटक सरकारने बंगळूरु, कोलार, चिकबल्लापूर, बंगळूरु ग्रामीण, रामनगर, मंगळूरु आणि तुमकूर या सात जिल्ह्यांमधून पेट्रोलचे १४ नमुने घेतले. बंगळूरु येथील श्रीराम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. अहवालानुसार १४ पैकी ११ नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त आढळले. इंडियन ऑईलच्या एका नमुन्यात ३१.२ टक्के, तर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एका नमुन्यात ३०.५ टक्के इथेनॉल सापडल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
केंद्राकडे कारवाईची मागणी, कंपन्यांचा इन्कार
या अहवालानंतर कर्नाटक सरकारने तेल कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि वाहन मालकांना भरपाई देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्यांनी कर्नाटक सरकारचे हे दावे फेटाळून लावले आहेत. वाहनचालक महागडे पेट्रोल खरेदी करत असताना त्यांना नेमके काय मिळत आहे, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply