राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जळगाव जिल्ह्यातील अनेक महिला लाभ घेत आहेत. मात्र, एक लाखांहून अधिक महिलांना ई-केवायसी आणि अन्य कारणांमुळे लाभ मिळू शकलेला नाही. आधार अद्ययावत नसणे आणि बँक खात्याच्या अडचणींमुळेही जिल्ह्यातील अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत. योजनेचे पोर्टल वर्षभरापासून बंद असल्याने नव्या लाभार्थींना अर्जही करता येत नाही.
या योजनेत सहभागासाठी अर्ज करण्याची १५ ऑक्टोबर २०२४ ही अखेरची मुदत होती. अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सतत केली जात आहे. मात्र, त्याबाबत निर्णय न झाल्याने महिला वर्गात नाराजी पसरली आहे. आपल्यासोबत दुजाभाव का, आपल्या अडचणी शासन का लक्षात घेत नाही, असाही सूर महिला वर्गात उमटत आहे.
या योजनेत २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिला सहभागी होऊ शकतात. वर्षभरात अनेक युवतींचे वय २१ वर्षे झाले आहे. मात्र, या युवती अर्ज करून योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत, कारण अर्जच शासन स्वीकारत नाही. पोर्टल बंद असल्याने नव्या अर्जदारांचा मार्ग बंद झाला आहे.
कागदपत्रांची अडचण
आधार अद्ययावत करण्याची प्रक्रिया अलीकडे क्लीष्ट आणि वेळखाऊ झाली आहे. नावात दुरुस्ती करण्यासाठी आता बारकोडयुक्त मतदान कार्ड, पासपोर्ट आदी कागदपत्रांची मागणी केली जाते. मतदान कार्ड अनेक महिलांकडे बारकोडयुक्त नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे महिलांना प्रथम मतदान कार्ड अद्ययावत करावे लागते, कारण कमाल महिलांकडे पासपोर्ट नाहीत. आधार अद्ययावत करण्यासाठी अर्ज केल्यानंतरही काही महिलांचे अर्ज आधारच्या पोर्टलवरून फेटाळण्यात आले. योग्य पुरावा दिलेला नसल्याचा दावा त्यात सबब म्हणून करण्यात आला. त्यामुळे महिलांना हकनाक त्रास झाला असून दोन-दोन वेळा आधार अद्ययावत करण्यासाठी अर्ज करावे लागले आहेत. अद्यापही अनेकांचे आधार अद्ययावत झालेले नाहीत.
नव्या लाभार्थ्यांचे काय?
पुढे अनेक मुलींचे वय २१ वर्षे होणार आहे. तसेच अनेक महिला विविध तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर करू शकल्या नाहीत. या महिला आणि मुली या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतील, यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवावी, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ज्यांना लाभ मिळाला, त्यांचाच विचार न करता जे वंचित राहिले आहेत, त्यांच्याबाबतही योग्य तो निर्णय प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply